दुसऱ्या टप्प्यातील अनुदान तातडीने द्या

घरेलु कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा इशारा

इचलकरंजी: विजय मकोटे
दि: २९ डिसेंबर घरेलु महिला कामगारांना कोविड काळातील दुसर्‍या टप्प्यातील अनुदान तातडीने मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी ताराराणी पक्ष संलग्न नवक्रांती महिला कामगार संघटना आणि सीआयटीयु संलग्न कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटना यांच्या घरेलु कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देऊन आठ दिवसात मागण्यांची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
कोविड काळात राज्य शासनाच्यावतीने घरेलु महिला कामगारांना 1500 रुपये कोविड अनुदान देण्याची आणि त्यासाठी आर्थिक तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सन 2015 ते 2021 या काळात नोंदीत महिला कामगारांना अनुदान मिळाले. परंतु सन 2011 ते 2014 या काळात नोंदीत महिला कामगार अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने घरेलु कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सौ. मंगल सुर्वे, सौ. सुवर्णा लाड व अहमद मुजावर,  आणि कॉ. शाजाद मुजावर, कॉ. पार्वती जाधव व कॉ. दत्ता माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत शासनाच्या दुर्लक्षपणाबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने कामगार अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, दिवाळीनंतर दुसर्‍या टप्प्यात सन 2011 ते 14 या काळात नोंदीत महिलांना अनुदान देण्यात येणार होते. परंतु  शासनाकडून केवळ वेळकाढूपणा केला जात आहे. या संदर्भात कामगार मंत्र्यांकडेही विचारणा केली असता सरकारकडे पैसे नसल्याचे सांगितले जाते. जर पैसेच नसतील तर घोषणा का केली असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर 60 वर्षे वय झालेल्या ज्या घरेलु महिला कामगारांना कोविड अनुदान नाकारले आहे, त्या सर्व महिलांनाही अनुदान मिळाले पाहिजे अशीही मागणी केली आहे. या मागण्यांची पुतर्तता न झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात घरेलु महिला कामगार सहभागी झाल्या होत्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.