देवरुख शहरातील 3 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
देवरुख:-अजित गवाणकर
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले आहे. अशात अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.हे विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासन परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.रशिया – युक्रेनच्या युध्दामुळे जगाची चिंता वाढली असतानाच, देवरुख मधील ३ विद्यार्थी युक्रेनमधे अडकले आहेत.
देवरूखचे विद्यार्थी अद्वैत विनोद कदम, जान्हवी राजा शिंदे आणि साक्षी प्रकाश (राजू)नरोटे युक्रेन मधील खारकीव्ह शहरात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. हे तिघेही आजपासून सुरू झालेल्या युद्धामुळे तिथे अडकले आहेत. हे विद्यार्थी ५ मार्च रोजी भारतात परतणार होते मात्र आजपासून सुरू झालेल्या युद्धामुळे ते अडकून पडले आहेत.यातील साक्षी नरोटे हिचे वडील राजु नरोटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपली मुलगी सुरक्षित असल्याचे सांगितले. काल रात्री आणि आजही तिच्याशी संपर्क झाला असून तिने आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आम्हाला बंकर मध्ये हलविण्यात आले असून भारत सरकार मदत करेल तेव्हा आम्ही बाहेर पडु असे तिने पालकांना सांगितले.अद्वैत कदम चे वडील विनोद कदम यांच्याशी संपर्क साधला असता आमचा पाल्य सुरक्षित असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. सोशल मिडिया द्वारे आमचा संवाद सुरू असून आम्ही याची माहिती जिल्हा आणि राज्य नियंत्रण कक्षाला दिली आहे असे सांगितले. हे सर्वजण सुखरूप मायदेशी परत यावेत यासाठी शहरवासिय प्रार्थना करत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.