शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन करून शिबिर यशस्वी करावे

अनिल बागणे : टाकळीवाडी शरद कृषीचे एन.एस.एस. शिबिर

शिरोळ: प्रतिनिधी

दि. १ एप्रिल विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये गावातील व समाजातील विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पाण्याचे व्यवस्थापन, ऊर्जेची बचत करण्याच्या उपाययोजना राबविण्यासाठी गावचे एनर्जी ऑडिट करावे. त्यानुसार शक्य ते बदल सुचवावेत. विविध समस्यावर शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन करून शिबिर यशस्वी करावे असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्युटचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते टाकळीवाडी येथे शरद कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ मंगल परशराम बिरनगे होत्या.

आर. बी. जुगळे यांनी शिबिरातून गावाची स्वच्छता तर होतेच, त्याशिवाय गावकऱ्यांचे प्रबोधन होते. त्यामुळे प्रत्येक गावाला अशा शिबीराची आवश्यकता आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. सरपंच सौ. मंगल बिरणगे यांनी शिबिरासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

या शिबिरादरम्यान दररोज श्रमदान, पथनाट्य, जनजागृती, वृक्षारोपण, प्रभात फेरी व विविध विषयांवर व्याख्याने असे उपक्रम आयोजित केले आहेत.

दररोज विविध विषयावर व्याख्याने होणार असून यामध्ये डॉ. सविता सिद्धनाळे यांचे “आरोग्याचे महत्व”, सौ. आशाराणी मगदूम, “समाजातील स्त्रीचे सध्याचे बदलते स्थान”, प्रा. सचिन तोडकर यांचे “जनावरांचे संगोपन व व्यवस्थापन”, प्रा. धीरज पवार यांचे “फळे व भाजीपाला प्रक्रिया” आदी विषयावर मार्गदर्शन होणार आहेत. तसेच संध्याकाळी विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवर पथनाट्य सादर केले जाणार आहेत.

शिबिराचे आयोजन शरद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. माणगावे, उपप्राचार्य एस. एच. फलके, कार्यक्रम आधिकारी डी. आर. मगदूम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ग्रामपंचायत टाकळीवाडी करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.