शिरोळ तालुक्यातून गोकुळचे संकलन वाढविण्यासाठी दूध उत्पादकांच्या भेटीसाठी गावोगावी दौरा करणार
मुरलीधर जाधव (संचालक -गोकुळ दूध संघ,)
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि.११जून :.गोकुळ दूध हे दुधाच्या उत्तम प्रतीसाठी व चवीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. आजतागायत गोकुळ दूध संघाने सातत्याने तंत्रज्ञानाची कास धरत उत्पादकांचे हीत डोक्यात ठेवून वाटचाल केली आहे. गोकुळच्या दुधाची चव आणि गुणवत्ता ओळखून दुधाची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे संघाने अधिकचे दूध संकलन करण्यावर भर दिला आहे आणि हेच लक्ष घेऊन शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त दूध गोकुळकडे संकलित होण्यासाठी तालुक्यातील दूध उत्पादकांच्या भेटीसाठी गावोगावी दौरा करणार असल्याचे मत शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख तथा ‘गोकुळ’चे शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले. उदगाव येथील गोकुळच्या चिलिंग सेंटर भेटीप्रसंगी ते बोलत होते.
गोकुळच्या माध्यमातून जनावरांची संख्या वाढविण्यासाठी व त्यांचे योग्य संगोपन करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याची माहिती खेडोपाड्यातील दूध संस्था व सामान्य दूध उत्पादकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच या योजनांचा जास्तीत जास्त लाभ दूध उत्पादकांना मिळावा हा हेतू लक्षात ठेवून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या गोकुळच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासह भेटी घेऊन दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत संचालक मुरलीधर जाधव यांनी मांडले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे,आण्णासो बिलोरे, राजेंद्र पाटील यांच्यासह गोकुळच्या उदगाव चिलिंग सेंटरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.