समाज कल्याण कार्यालयामध्ये गौरी पोवार ‘कार्यालयीन सहाय्यक’ पदावर रुजू

कोल्हापूर : प्रतिनिधी

 दि. ३ जुलै : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आर्थिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या पुढाकाराने जिल्हयात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त कार्यालय व कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २ तृतीयपंथीय व्यक्तींना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर कार्यालयामध्ये ‘कार्यालयीन सहाय्यक’ म्हणून नियुक्ती दिली असून आज दि. 1 जून रोजी समाजकल्याण कार्यालायामध्ये त्या हजार झाल्या आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. तसेच जोया दिन्नी या तृतीयपंथी देखील दोन दिवसात रुजू होणार आहेत.

तृतीयपंथीयांचे हक्काचे संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या जिल्हा निवारण समितीच्या मान्यतेने तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणाच्या प्रयोजनसाठी विविध उपक्रम या समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येतात. तृतीयपंथीयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच व्यवसाय व कौशल्य विकासाबाबत शासन प्रयत्न करत आहे.

समाजामध्ये नवीन क्रांती घडवून या नाविन्यपूर्ण निर्णयामुळे समाजातील या दुर्लक्षित झालेल्या घटकाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास सुरुवात होईल, तसेच इतरत्र त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टिने हे प्रयत्न नक्कीच सार्थकी होतील. या समाज घटकाची शासनामार्फत मुलभूत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे मत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.