सर्वच रेशन कार्डधारकांची दिवाळी होणार गोड

१०० रुपयात मिळणार दिवाळीसाठी अन्नधान्य : आ. आवाडे

इचलकरंजीसंजय आंबे
दि. १७ : दिवाळीचा गोडवा आणखीन वाढण्यासाठी राज्य शासनाने 100 रुपयात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वच रेशन कार्डधारकांना दिवाळीपूर्वी अन्नधान्य मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
राज्य शासनाने दिवाळी सणानिमित्त अंत्योदय योजना आणि दारिद्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांना केवळ 100 रुपयात प्रत्येकी 1 किलो चनाडाळ, साखर आणि 1 लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी इतर केशरी रेशन कार्डधारक या योजनेपासून वंचित राहणार आहेत.  त्यामुळे सर्वच रेशन कार्डधारकांना हे अन्नधान्य मिळण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी कॉ. सदा मलाबादे व शिष्टमंडळाच्या वतीने आमदार आवाडे यांच्याकडे केली आहे. पण तत्पूर्वीच आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उपरोक्तप्रमाणे मागणी केलेली आहे.
वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजी शहरात कामगार आणि झोपडपट्टीवासियांची संख्या मोठी आहे. वाढत्या महागाईचा सामना करत जीवन जगणार्‍या व हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्य सर्वच केशरी रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या इचलकरंजीसह अंत्योदय व बीपीएल रेशन कार्डधारकांबरोबरच सर्वच केशरी रेशन कार्डधारकांनाही दिवाळी सणानिमित्त 100 रुपयांमध्ये अन्नधान्य योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला असून लवकरच त्याची पूर्तता होईल, असे आमदार आवाडे यांनी सांगितले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.