स्त्री ही अबला नसून अतिबला आहे-

श्रीमती सोनल बोहरा

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 

दि ९ : ‘महिलांनी स्वतःला कमजोर समजून नये. सर्व जबाबदा-या सक्षमपणे पूर्ण करण्यास त्या सक्षम आहेत. लेझीम सारखा खेळ विद्यार्थिनी व शिक्षिकांनी खेळून सर्वा पुढे सक्षमतेचा आदर्श ठेवला आहे.’ असे प्रतिपादन श्रीमान मदनलालजी बोहरा मार्केटच्या व्हा. चेअरमन श्रीमती सोनल बोहरा यांनी केले. येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनि. कॉलेज मध्ये आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी सौ. प्रिया कृष्णाजी बोहरा यांची ही प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या, ‘मुलींनी खुप शिकावे, सशक्त बनावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, आधार मागू नये तर तो इतरांना द्यावा. रामायण, महाभारत यामध्ये सुध्दा दुष्टांचा संहार करण्यासाठी महिलांनीच मोठे योगदान दिले आहे.’ यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थिनींना सक्षम नारी बनण्याची शपथ दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस. गोंदकर या होत्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्या म्हणाल्या, ‘महिलांनीच जग सुंदर बनविण्यासाठी परीश्रम घेतले आहेत. स्त्री जेवढी हळवी असते तेवढीच ती खंबीर आणि सामर्थ्यशाली असते हे अनेक प्रसंगामध्ये महिलांनी सिध्द करुन दाखविले आहे.’

प्रारंभी गंगामाई लेझीम पथकासह सवाद्य मिरवणुकीने प्रमुख पाहुण्यांचे प्रशालेत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षिकांनीही लेझीम खेळतच सभास्थानी प्रवेश केला. या क्षणाचे साक्षीदार असलेल्या विद्यार्थिनी व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनीही टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीमंत गंगामाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रारंभी या कार्यक्रमात सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे यांनी केले. नारीशक्तीचा उचित सन्मान करण्यासाठी आजच्या जागतिक महिला दिनी प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका व कर्मचा-यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमान मदनलालजी बोहरा मार्केटच्या व्हा.चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल श्रीमती सोनल बोहरा यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक महिला दिनीच त्यांचा वाढदिवस असल्याने प्रशालेच्या वतीने केक कापून मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला.

यावेळी महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी स्त्री जीवन उलघडून दाखविणारे अनेक कार्यक्रम सादर करून जागतिक महिला दिन अविस्मरणीय पध्दतीने साजरा केला. याप्रसंगी सौ. प्रज्ञा सिध्दार्थ गोंदकर, उपप्राचार्य श्री. आर. एस. पाटील, पर्यवेक्ष श्री. व्ही. एन. कांबले, श्री. एस. व्ही. पाटील, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शेखर शहा तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आर. एस. रॉड्रीग्युस यांनी केले. सौ. पी.डी. कुलकर्णी व विभाग प्रमुख सौ. व्ही.डी. रावळ यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.