जिल्ह्यातील अन्य संगांयो कार्यालयाप्रमाणे इचलकरंजीतही अंमलबजावणी करण्याबाबत आदेश द्यावेत,
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य कोंडीबा दवडते यांनी निवेदनाद्वारे केली मागणी
इचलकरंजी -प्रतिनिधी –
दि २ : संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना स्वयंस्पष्ट आणि अत्यल्प कागदपत्रांचा अर्ज शासनाकडून देण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात केवळ इचलकरंजी वगळता केली जात आहे. मात्र इचलकरंजीतील कार्यालयाकडून 20 ते 25 पानांचा अर्ज देऊन अवाजवी कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे लाभार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य संगांयो कार्यालयाप्रमाणे इचलकरंजीतही अंमलबजावणी करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य कोंडीबा दवडते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात, शासनाने गोरगरीब निराधारांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना विनासायास मदत मिळावी या हेतुने संजय गांधी निराधार योजना सुरु केली आहे. परंतु इचलकरंजी कार्यालयाकडे संगांयो अनुदान मागणीचा अर्ज करताना लाभार्थ्यांना विनाकारण त्रास होईल अशा पध्दतीची मागणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इतर संगांयो कमिट्यांकडून अर्ज स्विकारत असताना स्वयंस्पष्ट ते चार ते पाच पानी अर्ज स्विकारला जातो. त्याउलट इचलकरंजी कार्यालयाकडून लाभार्थ्यांना त्रास देण्याच्या हेतुने 20 ते 25 पानी अर्जाची मागणी केली जाते. वस्तुत: शासनाने 20 ऑगस्ट 2019 रोजी जारी केलेल्या अध्यादेशात सोपा आणि सुटसुटीत व लाभार्थ्यांना त्रास होणार नाही असा केवळ 4 ते 5 पानी अर्ज दिलेला आहे. असे असताना त्या अध्यादेशाकडे दुर्लक्ष करुन इचलकरंजीतील कार्यालयाकडील अवाजवी मागणीमुळे शासनाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासला जात आहे. या संदर्भात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील संगांयो कमिट्या व कार्यालयाकडून माहिती घेऊन इचलकरंजी शहर कार्यालयात लाभार्थ्यांना दिल्या होणारा त्रास थांबवून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एक नमुना ठेवून लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी दवडते यांनी केली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.