
उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या काढून एरियल बंच बसवण्याची मागणी
आमदार आवाडे यांच्या शिष्टमंडळाची महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .६ : शहरातील शेळके मळा, आवाडे सब स्टेशन, मुजावर पट्टी, तोडकर मळा या दाट लोकवस्तीच्या भागातील अनेक घरांवरुन गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या काढण्याबाबत आमदार प्रकाश आवाडे व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणी लवकरात लवकर एरियल बंच बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी दिली. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात कमी उंचीवर असलेले ट्रान्सफार्मरही योग्य ठिकाणी बसविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
इचलकरंजीतील गावभाग परिसरातील शेळके मळा, आवाडे सबस्टेशन, मुजावरपट्टी, तोडकर मळा हा भाग गोरगरीब सर्वसामान्य कामगार वस्तीचा भाग आहे. या भागात दाटवस्तीमुळे घरे एकमेकांना लागूनच आहेत. शेळके मळा परिसरातील लक्ष्मण कोकरे घर ते म्हाळू लवटे घर ते तराळ घर कोपरा घरांवरून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक सतत भितीच्या छायेत असतात. विद्युत वाहिनी घरावरुन गेल्याने दुसरा मजला करता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या बदलून याठिकाणी एरियल बंच बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार आवाडे यांनी जिल्हा नियोजन व विकास मंडळातून या कामासाठी मंजूरी घेतली आहे.
त्या अनुषंगाने गावाभागातील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता राठी यांची भेट घेऊन हे काम तातडीने करण्याबाबत निवेदन दिले. त्यावर राठी यांनी या कामाची कार्यवाही तातडीने करण्याची ग्वाही दिली आहे. शिष्टमंडळात अशोक बारटक्के, आशिष पाटील, बाळासाहेब मिठारी, किशोरी पाटील, विठ्ठल जोंग, दिलीप वायचळ व नागरिकांचा समावेश होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.