केएटीपी पार्कमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविणार : आमदार आवाडे

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 
दि .२९: अनेक उद्योग एकाच ठिकाणी असलेला राज्यातील नव्हे तर देशातील एकमात्र टेक्स्टाईल पार्क असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅण्ड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) या संस्थेच्या वतीने आता सौरऊर्जा वीज प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात येणार असून असा प्रकल्प राबविणारी केएटीपी ही पहिलीच संस्था ठरेल, अशी घोषणा संस्थेचे माजी अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे होते.
केएटीपी या संस्थेची १८वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. प्रारंभी  मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षस्थानावरुन बोलताना संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना तारदाळ-हातकणंगले-मजले येथील २१०  एकर जमीनीतील औद्योगिक वसाहतीत 170 प्लॉटस् भाडेपट्ट्याने दिले आहेत. त्याठिकाणी टेक्स्टाईल, विंड मिल, इंजिनिअरींग, फौंड्री, मशिन शॉप, पॉवर टुल्स, राईस मिल असे विविध उद्योग उभारले असून या माध्यमातून 2500 कोटीची गुंतवणूक झाली आहे. या प्रकल्पावर संस्थेने केंद्र सरकारकडील अनुदान २२.१६ कोटी व राज्य शासनाकडील २.७० कोटी व संस्था स्वभांडवलातून ७.८१ कोटी असे ३२.६७ कोटी खर्च केले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१३ अंतर्गत पायाभूत सोयी-सुविधा निर्मिती योजना अंतर्गत २४९.८४  लक्ष किंमतीच्या पायाभूत सुविधा कामाचा प्रकल्प मंजूर झालेला असून त्यातून कामे पूर्ण झालेली असल्याचे सांगत सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घोडदौड सुरु असल्याचे सांगितले.
संस्थेचे कार्यकारी संचालक निशिकांत सावर्डेकर यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्वच विषयांना सभासदांनी एकमताने मंजूरी दिली. यावेळी औद्योगिक वसाहतीत दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल केएटीपी असोशिएशनचे चेअरमन सुभाष बेलेकर व उद्योजकांनी आमदार आवाडे यांचा सत्कार केला. त्याचबरोबर वसाहतीत पोलिस स्टेशन सुरु करण्याची मागणी केली. संस्थेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब कलागते यांनी आभार मानले.
यावेळी सुनिल पाटील, अहमद मुजावर, शिवाजी काळे, अनिल कुडचे, रफिक खानापुरे, राजेंद्र बचाटे, संजय केंगार, विश्‍वनाथ अग्रवाल, संस्थेचे संचालक सुरेश बावणे, सर्जेराव पाटील, रमेश कबाडे, महावीर येळरुटे, सुमेरु पाटील, बाळासाहेब माने, नरसिंह पारीक, चंद्रकांत इंगवले, महादेव कांबळे, शकुंतला जाधव, सुवर्णा पाटील तसेच मॅनेजिंग डायरेक्टर निशिकांत सावर्डेकर यांच्यासह सभासद, विविध संस्थाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.