इचलकरंजीत गणेश विसर्जनासाठी ४६ कृत्रिम कुंडांची व्यवस्था!
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेचा पुढाकार; घराजवळील कुंडात अथवा शहापूर खण येथे मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि १४ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने यंदाही शहरातील विविध भागांत ४६ ठिकाणी कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन कुंड अथवा शहापूर खण येथे गणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरण संवर्धनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उदय धातुंडे आणि महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन केल्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येते. या उपक्रमाला शहरवासीयांकडून दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यंदाही नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील विविध भागांमध्ये झोननिहाय एकूण ४६ कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात येणार आहेत.
झोन ‘ए’मधील विसर्जन कुंड : महासत्ता चौक, नारायण टॉकीज, बिग बाजार, सोनपावली मंदिर-खंजीरे मळा, के. एल. मलाबादे चौक, संभाजी चौक, हत्ती चौक, शाहू हायस्कूल, महात्मा गांधी पुतळा, महाराणा प्रताप चौक, स्फूर्ती कॉर्नर, मरगुबाई मंदिर, डीवायएसपी कार्यालयाजवळ आणि वैरण बाजार या ठिकाणी कुंडांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
झोन ‘बी’मध्ये : बालाजी प्रोसेस चौक, शिवतीर्थ, आण्णा रामगोंडा भाजी मार्केट, अनुपम हॉटेलजवळील शाहू पुतळा, शिवमंदिर, श्रद्धा कॉलनी, किसान चौक, तीन बत्ती चौक, षटकोन चौक, धर्मराज चौक, बंडगार माळ, लिंबू चौक, दुर्गामाता मंदिर आणि तांबे माळ या ठिकाणी विसर्जन कुंड असतील.
झोन ‘सी’मध्ये : मणेरे हायस्कूल, डेक्कन सिग्नलजवळ, मराठा चौक, मारुती मंदिर, विकासनगर येथील नागोरी किराणा स्टोअर्सजवळ, थोरात चौक, राधाकृष्ण चौक, वर्धमान चौक, सरस्वती हायस्कूल आणि साई मंदिर या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
झोन ‘डी’मध्ये : गणपती मंदिर-जावईवाडी, सावली सोसायटी, शहापूर गाव चावडी, तोरणा नगर, दत्तनगर रिक्षा स्टॉप, गणेशनगर गल्ली क्रमांक ४, शिवमंदिर-मधुबन सोसायटी आणि सांगली नाका या ठिकाणी कुंड उभारण्यात येणार आहेत.
महानगरपालिकेने नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता महानगरपालिकेच्या कृत्रिम विसर्जन कुंडात किंवा शहापूर खण येथे करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे जलप्रदूषण रोखण्यास मदत होऊन पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहर स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करताना पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देऊन महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
‘शहापूर खण’सह ४६ ठिकाणी सुविधा
घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नागरिकांना आपल्या घराजवळच सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिकेने शहरातील चारही झोनमध्ये ४६ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता जवळच्या कुंडाचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.