अंमली पदार्थ तस्करांना रत्नागिरी पोलिसांचा दणका; वर्षभरात ६४ गुन्हे, ९२ आरोपी जेरबंद
१४ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त; एमआयडीसी कंपन्यांची संयुक्त तपासणी करण्याचे अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचे निर्देश
रत्नागिरी :दिपक तुळसणकर
दि.२९: जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या वर्षभरात अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार ६४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ब्राऊन हेरॉईन, हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी असा एकूण १४ लाख २८ हजार ६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नार्को को-ऑर्डिनेशन (एनकॉर्ड) जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
एमआयडीसीतील कंपन्यांची संयुक्त तपासणी
अंमली पदार्थांचे उच्चाटन हा केंद्र व राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय असल्याचे सांगत महामुनी यांनी कारवायांची तीव्रता आणखी वाढविण्याचे निर्देश दिले. एमआयडीसी परिसरातील संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवावी. बंद कारखाने तसेच संशयास्पद कंपन्यांची कसून तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सागरी सुरक्षेसह परप्रांतीय कामगारांची पडताळणी
रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा अंमली पदार्थ तस्करीसाठी गैरवापर होऊ नये, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील मासेमारी बोटींची नियमित तपासणी करावी. विशेषतः बोटींवर काम करणाऱ्या नेपाळी व अन्य परप्रांतीय कामगारांची पार्श्वभूमी आणि कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करावी, असे महामुनी यांनी स्पष्ट केले.
जनजागृती मोहिमेत सर्व विभागांनी सहभागी व्हावे
पोलीस दलाकडून ग्रामसभांच्या माध्यमातून अंमली पदार्थविरोधी तसेच सायबर गुन्हेगारीविरोधात जनजागृती केली जात आहे. शिक्षण विभागानेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. अंमली पदार्थांविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी ही जबाबदारी सामूहिक मानून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.