कसबा हायस्कूलमध्ये टेबल टेनीस व कँरम संच उद्घाटन सोहळा संपन्न
संगमेश्वर: मोहम्मदताहा नेवरेकर
कसबा ता. संगमेश्वर येथील संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित, न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयाला संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीकडून टेबल टेनीस संच व कसबा वेलफेअर असोशिएशनकडून कँरम संच भेट स्वरुपात देण्यात आला.संस्थेने दोन्ही क्रीडा प्रकारासाठी नवीन इमारतीतील प्रशस्त खोली उपलब्ध करून दिलेली आहे. सदर क्रीडा साहित्याचे उद्घाटन मा. श्री. उदय झावरे, पोलीस निरीक्षक, संगमेश्वर पोलीस ठाणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. नबील मोगल, उपकार्यकारी अभियंता, विद्युत वितरण, संगमेश्वर व मा. श्री. सागर मुरुडकर, पोलीस आंमलदार, संगमेश्वर पोलीस ठाणे उपस्थित होते.
टेबल टेनीस व कँरम संचाच्या उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी दोन्ही खेळांचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी श्री झावरे यांनी संस्थेचे पंचक्रोशीतील मुलांसाठी शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील सोयीसुविधांबद्द्ल कौतूक केले.विद्यालयातील गीतमंचच्या वतीने ईशस्तवन व स्वागतपद्याने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्तविकपर भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री मणेर सर यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. कसबा शाफई जमातीने मोठ्या त्यागातून संस्थेची भक्कमपणे उभारणी केलेली असून जिल्ह्यात एक नामांकित शिक्षण संस्था म्हणून नावारुपास आणल्याचे नमूद केले.शाळेस टेबल टेनीस व कँरम संच उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्था व कसबा वेलफेअर असोशिएशनचे आभार प्रकट करून विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना या संचांचा खूप चांगला उपयोग होईल असे मत मांडले.उद्घाटन समारंभास उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 12 वी विज्ञान शाखेतील कुमारी पायल तानाजी दोरखडे या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले.
पोलिस निरिक्षक श्री उदय झावरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा व स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्वताला सिद्ध करावे असा मूलमंत्र दिला. स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र सर्वांसाठी खुले असून प्रचंढ मेहनत करण्याची तयारी असणार्यांनीच या क्षेत्राकडे वळावे हे सांगताना अनेक उदाहरणे दिली.
पोलीस विभागामार्फत ‘एहसास उपक्रमांतर्गत’ सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा याविषयी बोलताना श्री. झावरे यांनी सायबर गुन्ह्यासंबंधी उदाहरणासह माहिती देऊन त्यापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे किती आवश्यक आहे? याविषयी उद्बोधन केले. सोशल मिडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? विशेषतः मुलींनी जास्त दक्षता घ्यावी असे सांगत खेळीमेळीच्या वातावरणात मुला-मुलींशी संवाद साधत पोलीस विभागामार्फत राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.
सदर कार्यक्रमाला संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. नियाज कापडी, उपाध्यक्ष मा. इब्राहिम काझी, सचिव मा. सईद उपाद्ये, सहसचिव मा. मुजफ्फर मुल्ला, खजिनदार मा. शुकूर गैबी, शाफई जमात अध्यक्ष मा. जीयारत मुल्ला, संस्थेचे सदस्य मा. शौकत खलपे, मा. हशमतअल्ली कापडी, मा.महामुद काझी, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा, मणेर सर, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका श्रीमती जुवळे मँडम, श्रीमती बेग मँडम, दोन्ही माध्यमाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षक एस. ए, पटेल यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.