इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने चारही झोनमध्ये महास्वच्छता अभियान राबविले

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि. १४ फेब्रुवारी – इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील A, B, C आणि D झोनमध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत हे अभियान राबविले जाते. महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी चारही झोनमधील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून कचरा संकलन व साफसफाई केली. या अभियानासाठी आरोग्य विभागाने पूर्वनियोजन केले होते.

महास्वच्छता अभियानात झोननिहाय स्वच्छता उपक्रम

➡ A झोन – चांदणी चौक ते पद्मा लॉन्ड्री, डांगरे गल्ली परिसर, फळ मार्केट, लायकर गल्ली, धान्य ओळ परिसर.
➡ B झोन – डॉ. काजवे हॉस्पिटल ते गोकुळ चौक, डॉ. ढवळे हॉस्पिटल ते अल्ताफ चिकन दुकान, आरेकर मैदान, बोनगे गल्ली, मोरबाळे गल्ली, पटवा गल्ली, शिवेचा मारुती तालीम परिसर.
➡ C झोन – गणपती रोड, मासाळ गल्ली, ज्योतिबा मंदिर परिसर, काजवे गल्ली, आदर्श झोपडपट्टी, डोंडगे गल्ली, शिवमंदिर, वडर झोपडपट्टी, मुळीक गल्ली.
➡ D झोन – लाल नगर लेडीज शौचालय परिसर, नारायण नगर, पोलीस क्वार्टर्स उत्तर व दक्षिण बाजू, आवळे गल्ली.

या अभियानात सुमारे ४५० सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

प्रशासनाचा सक्रीय सहभाग

या स्वच्छता अभियानाचे मार्गदर्शन उपायुक्त स्मृती पाटील आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी केले. मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड ऑफिसर आणि मुकादमांनीही अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त पल्लवी पाटील यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत आजच्या महास्वच्छता अभियानाचा आढावा घेतला आणि संपूर्ण शहरात सातत्याने स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.

नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

महास्वच्छता अभियानामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणे आणि गल्ल्या अधिक स्वच्छ झाल्या आहेत. नियमितपणे असे उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महानगरपालिकेने हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.