इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२२ नोव्हेंबर: “रेकी ही केवळ उपचार पद्धती नसून जीवन जगण्याची एक दिव्य कला आहे. वैश्विक प्राणऊर्जेच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक समतोल साधून मानवी जीवन समृद्ध करता येते.” असे प्रतिपादन पुण्याच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रेकी ग्रँडमास्टर श्रीमती अस्मिता सोवनी यांनी केले. रोटरी परिवार आणि रेकी मास्टर हीलर संजय पोतदार यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी श्रीमती सोनीदेवी रामविलास बाहेती सेवा केंद्र येथे आयोजित ‘रेकी: दैवी वैश्विक प्राणऊर्जा’ या व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
गेली ३३ वर्षे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोवनी यांनी रेकी म्हणजे काय, तिचा उगम, तत्त्वे आणि साधनेची पद्धत यावर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता, सकारात्मकता, नातेसंबंधांतील गोडवा आणि व्यवसायात योग्य निर्णयक्षमता मिळवण्यासाठी रेकी कशी उपयुक्त ठरते, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आधुनिक वैद्यकशास्त्राला ‘पूरक साथ’ म्हणून तणावमुक्ती व रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तिचे महत्त्व सांगितले. व्याख्यानानंतर त्यांनी साधकांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
स्वागत रो. हेमंत दोशी यांनी, प्रास्ताविक रो. शितल उपाध्ये यांनी तर पाहुण्यांची ओळख रो. पंकज कोठारी यांनी करून दिली. अस्मिता सोवनी यांचा सत्कार संजय पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी आभार रो. प्रमोद महाजन यांनी मानले. या कार्यक्रमास इचलकरंजी परिसरातील नागरिक व साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. शिवचंद जाखोटीया, ॲड. शिवकुमार धड्ड व ॲड. जवाहर छाबडा यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या बरोबरच सोमवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ रोजी रेकीच्या प्राथमिक स्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार असून त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.