रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी इचलकरंजीत कडकडीत बंद; प्रांत कार्यालयावर धडकला मोर्चा

अनधिकृत बाइक टॅक्सीविरोधात संताप; ओला-उबरच्या भाडे धोरणासह परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि.२४: अनधिकृत बाइक टॅक्सीमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर निर्माण झालेले संकट, रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची रखडलेली अंमलबजावणी आणि ऑनलाइन प्रवासी वाहतूक कंपन्यांच्या मनमानी धोरणाविरोधात इचलकरंजीतील रिक्षाचालकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. शहरासह कबनूर, कोरोची व परिसरातील रिक्षाचालकांनी एकजुटीने कडकडीत बंद पाळत शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे शहरातील प्रवासी वाहतुकीचे चाक थांबले असून विद्यार्थी वाहतुकीलाही मोठा फटका बसला.इचलकरंजी शहर संयुक्त रिक्षाचालक-मालक कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध रिक्षाचालक संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून आंदोलनाला सुरुवात झाली. तेथून शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढत आंदोलक प्रांत कार्यालयावर पोहोचले. यावेळी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

छाया : सचिन तिगडी
छाया : सचिन तिगडी  (मोर्चानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देते वेळी महाराष्ट्र रिक्षाचालक-मालक संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, इंदिरा ऑटो रिक्षा युनियन, शिवसेना रिक्षाचालक-मालक संघटना, भारतीय जनता पक्ष रिक्षा युनियन, हातकणंगले रिक्षा मित्र मंडळ)

मोर्चानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अनधिकृत बाइक टॅक्सी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी, रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, ओला-उबरसह ॲप आधारित कंपन्यांच्या भाडे धोरणावर शासनाने नियंत्रण ठेवावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय एटीएस सेंटर आणि परिवहन विभागातील कथित आर्थिक पिळवणुकीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, रिक्षाचालकांसाठी सुरक्षित पार्किंगची व्यवस्था करावी, अशा मागण्याही निवेदनातून मांडण्यात आल्या. राज्यातील सुमारे २५ लाख रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून हा संप पुकारण्यात आला होता.
या आंदोलनात महाराष्ट्र रिक्षाचालक-मालक संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, इंदिरा ऑटो रिक्षा युनियन, शिवसेना रिक्षाचालक-मालक संघटना, भारतीय जनता पक्ष रिक्षा युनियन, हातकणंगले रिक्षा मित्र मंडळ यांच्यासह विविध रिक्षा थांब्यांवरील पदाधिकारी व चालक-मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.