विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याची जय्यत तयारी – सर्वपक्षीय निर्णय

कोल्हापूर:प्रतिनिधी 

दि  २४: गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ सहकारी नेते विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा भव्य सर्वपक्षीय गौरव सोहळा विविध सामाजिक उपक्रमांसह एप्रिल महिन्यात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात आज सर्वपक्षीय बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे होते, तर प्रमुख मार्गदर्शक माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी विश्वास पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “गेल्या ५० वर्षांत आबाजींनी सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी शिरोली दुमालाचे डेप्युटी सरपंच ते गोकुळ दूध संघाचे चेअरमन असा प्रभावी कार्यकाल गाजवला आहे. ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचवण्याचे त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य सर्वपक्षीय गौरव सोहळा घेऊ.”

सामाजिक उपक्रमांची रेलचेल

गौरव सोहळ्यानिमित्त “विश्वास पाटील अमृतमहोत्सवी गौरव समिती” स्थापन करण्यात आली असून, या सोहळ्यात दूध उत्पादकांसाठी ‘आबाजीश्री स्पर्धा’, युवकांसाठी योग शिबिरे, कुस्ती स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, तसेच आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिर यांसारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

१३ एप्रिल रोजी भव्य समारंभ

विश्वास पाटील यांच्या कार्यावर आधारित “गौरव अंक” प्रकाशित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. १३ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या जन्मगावी शिरोली दुमाल, ता. करवीर येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य अमृतमहोत्सवी गौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

बैठकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील (सडोलीकर), केरबा पाटील (कोथळी), बाबासाहेब देवकर (गाडेगोंडवाडी), उदयानीदेवी साळोखे (वाशी), सुनील पाटील (वडणगे), एस.डी. जरग (महे), अमर पाटील (शिंगणापूर), युवराज गवळी (पाचगाव) आदींनी मनोगते व्यक्त केली.

गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी स्वागत केले, तर आभार शशिकांत पाटील (चुयेकर) यांनी मानले. बैठकीस आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, गोकुळचे संचालक, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, विविध सहकारी संघटनांचे पदाधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.विश्वास पाटील (आबाजी) यांच्या सहकारातील अमूल्य योगदानाचा सन्मान करणारा हा सोहळा कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक पर्व ठरेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.