लांजातील आठवडा बाजार सुरु करा

गटनेते संजय यादव यांची तहसीलदार, मुख्याधिकारींकडे निवेदनाद्वारे मागणी_

 

 

लांजा:प्रतिनिधी

दि.२० : भरणारा आठवडा बाजार बंद असल्याने तो पुन्हा सुरु करण्यात यावा यासाठी गटनेते तथा नगरसेवक संजय यादव यांनी तहसीलदार प्रमोद कदम व न.पं. मधील मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवदेन दिले.

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्यापासून जवळपास दिड वर्ष आठवडा बाजार बंद आहे. कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असताना सुरु करण्यात आलेला आठवडा बाजार रुग्ण संख्या वाढताच पुन्हा बंद करण्यात आला. एप्रिल पासून गेले सहा महिने आठवडा बाजार बंद असल्याने या कालावधी दरम्यान व्यापाऱ्यांनी, फेरीवाल्यांनी आर्थिक विवंचनेत सापडूनही खुप सहकार्य केले. पाली, देवरुख, पाचल, साखरपा मध्ये आठवडा बाजार सुरु करण्यात आले आहेत. लांजा पंचक्रोशीतील नागरिकांचे शहरातील आठवडा बाजार हा खरेदीचा मुख्य स्रोत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे गेले सहा महीने आठवडा बाजार बंद असल्याने त्याचा परिणाम सामान्य जनतेवर झाला असून भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. आठवडा बाजारात सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्टया परवडतील अशा वस्तुंच्या किंमती असल्याने आठ दिवस पुरेल अशा वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु गेले सहा महिने आठवडा बाजार बंद असल्यामुळे महागाईची तीव्र झळ सामान्य जनतेला बसत असून आर्थिक परवड होताना दिसते.

तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची होणारी गैरसोय व येत्या आठ दिवसांत येणारा दिवाळी सण लक्षात घेऊन मंगळवारी होणारा आठवडा बाजार सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात-लवकर सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत. अशी मागणी भाजपा गटनेते संजय यादव यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, नगरसेवक मंगेश लांजेकर, नगरसेविका शितल सावंत, हेमंत शेट्ये, विजय कुरुप, मयुर शेडे, बावा राणे, प्रकाश गुरव, शेखर सावंत, इकबाल गिरकर, ओमकार आंब्रे व प्रवीण सुर्वे आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.