“एक पेड मा के नाम” उपक्रम इंडो किड्स इंग्लिश हायस्कूलमध्ये उत्साहात साजरा
मातृप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा भावनिक संगम
कबनूर :हबीब शेखदर्जी
दि. 18 जुलै:इंडो किड्स इंग्लिश हायस्कूल, कबनूर येथे “एक पेड मा के नाम” हा आगळा-वेगळा उपक्रम आज उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. मातृप्रेमाचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला.
या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या हस्ते वृक्षारोपण केले आणि त्या झाडाला आपल्या आईचे नाव दिले. या माध्यमातून मातृत्वाला भावनिक श्रद्धांजली वाहतानाच पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्विकारली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन श्री. एन. एन. काझी यांनी विद्यार्थ्यांना मातृभक्ती आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारे प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी आईचा त्याग, तिचे स्थान आणि निसर्गाची गरज यांची परखड सांगड घालून उपस्थितांच्या मनाला स्पर्श करणारे मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिका सौ. नाझिया नवाब आणि श्री. शहानुर कमालशा यांनीही आपल्या हृदयस्पर्शी भाषणातून आईच्या ममतेचे आणि तिच्या जीवनातील योगदानाचे भावपूर्ण चित्र उपस्थितांसमोर उभे केले. त्यांच्या विचारांनी अनेकांचे डोळे पाणावले.
शाळेच्या प्रांगणात आईच्या पाय धुऊन तिच्या हस्ते झाडे लावण्याचा प्रसंग उपस्थित सर्वांसाठी अत्यंत भावनिक ठरला. विद्यार्थ्यांच्या आईंच्या नावाने लावण्यात आलेली ही झाडे केवळ निसर्ग संवर्धनाचे प्रतीक नाहीत, तर त्या प्रत्येक मातेसाठी एक जिवंत स्मृतीचिन्ह ठरतील.
या कार्यक्रमाला संस्थेच्या सेक्रेटरी सौ. समीरा पिरजादे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. समीना समडोळे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका सौ. सुषमा गवळी यांनी केले.
हा अभिनव उपक्रम भावनिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.