स्व. सा. रे. पाटील यांच्यासारखे नेतृत्व सहकाराला मिळाल्यास सहकारातून समृद्धी

सहकार व बँकिंग क्षेत्रातील तज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कर यांचे मत

शिरोळ : राम आवळे 
दि.३ : सहकाराचे मॉडेल कोठेही अयशस्वी झालेले नाही, पण सहकारातील भ्रष्टाचारामुळे प्रतिमा मलिन होत गेली आहे. सहकारी संस्थांना सरकारने केलेली मदत ही लोकांच्या पैशातील असते. ती परत करायची असते. पण सहकारात स्वाहाकार झाल्याने तोटा होत गेला. सहकारात सभासदांच्या हिताला प्रथम प्राधान्य असून नफा हा दुय्यम पाहिला जातो. सहकाराच्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम होते. स्व. सा. रे. पाटील यांच्यासारखे नेतृत्व सहकाराला मिळाले, तर सहकारातून सर्वांची समृद्धी होईल, असे प्रतिपादन डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार प्राप्त सहकार व बँकिंग क्षेत्रातील तज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कर यांनी केले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.बीचॅरिटेबल ट्रस्ट संचलित आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या वतीने आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी व किरण पाटील यांनी तिघांचीही मुलाखत घेतली.
विद्याधर अनास्कर पुढे म्हणाले, सहकारातून मनुष्यबळ व द्रव्य बळ मिळत असल्याने सत्ता केंद्र आपोआप तयार होते. सहकारातून सामान्य जनतेची समृद्धी झाली पाहिजे, पण सध्या सहकाराचा वापर हा राजकारणासाठी होतो आहे. प्रसार माध्यमांनी सहकारांमधील राजकीय लोकांच्या वरती लक्ष न देता सभासदांच्या हितावर लक्ष दिले पाहिजे. समाजाचे नेतृत्व करताना नेत्यांनी आपण कोणासोबत काम करीत आहोत, चाललो आहोत हे पाहणे आवश्यक आहे. आर्थिक शिस्त नसेल तर सहकार बुडतो, त्यामुळे सहकार चळवळ ही जिवंत राहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर जगात अशक्य काही नाही मूळ विषय समजला की पुढची दिशा नक्की होते, असे त्यांनी सांगितले. तसेच लहान वयात कमवा आणि शिका योजना, आर्थिक शिस्त, पैशाचे महत्व, बँकिंगची सवय, सहकाराचे महत्व, बँकिंग व्यवस्था, रिझर्व बँकेचे कामकाज, नवे सहकारी धोरण, सहकारी व खाजगी बँकांची गरज आदींची विस्तृत माहिती मुलाखतीमध्ये सांगून बँकांनी कर्जबाजारी शेतकऱ्याला पुन्हा उभारण्यासाठी मदत करावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कर्जबाजारीपणावर मार्ग नाही हे शेतकऱ्यांना पटवून देण्याची आवश्यकताही त्यांनी सांगितली.


डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. अरुणा रॉय यांचे सहकारी शंकरसिंग म्हणाले, माहिती अधिकार कायदा तयार होत असताना अनेकांनी विरोध केला. हा कायदा लागू होऊ नये असे मोठ्या कंपन्यांच्या बरोबर राजकारणी लोकांनाही वाटते. त्यासाठी माहिती अधिकार कायद्याला संपवण्याचे कारस्थान होत आहे. देशामध्ये प्रश्न विचारणाऱ्या 150 वर लोकांच्या हत्या झालेल्या आहेत. राजकारणामधून सुंदर स्वप्न पाहिले गेले. पण लोकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नाही असे दिसून येते. राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गडबड होत असून ही व्यवस्था बदलायची असेल तर राजकारणात चांगले लोक येणे गरजेचे आहे. पुरी व्यवस्था बदलण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे सांगून शंकरसिंग यांनी डॉ. अरुणा रॉय यांच्या सोबत केलेल्या कामाचे अनुभव, माहिती अधिकार कायदा, किसान मजदूर शक्ती संघटनेचे काम, बेअरफूट कॉलेज मधील प्रयोग अशा विविध गोष्टींची माहिती दिली.
हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी निसर्गामधील होणाऱ्या अनेक बदलांच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज तसेच पावसाचा अंदाज कशा पद्धतीने व्यक्त करता येतो याची अनेक उदाहरणासह विस्तृत माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी व श्रोत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तीनही वक्त्यांनी समर्पकरित्या दिली.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. स्वागत व प्रास्ताविक कु. भक्ती पाटील हिने केले. पाहुण्यांची ओळख कु. अनुजा पाटील हिने करून दिली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कु. मधुरा देशमुख हिने केले तर आभार कु. नैना खोत हिने मानले. यावेळी दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, शिरोळच्या नगराध्यक्ष योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, डॉ. महावीर अक्कोळे, पापा पाटील, अंबादास नानिवडेकर, मयूरभाई, गुंडाप्पा पवार, शेखर पाटील, यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, संचालिका, इन्स्टिट्यूट चे प्रिन्सिपल, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.