निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृध्द जीवनाचे खरे आधार: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम
जिल्हा व सत्र न्यायालय, सांगली येथे आरोग्य दिन साजरा
सांगली: अय्यान पटेल
दि.८: समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृद्ध जीवनाचे खरे आधार आहेत, असे प्रतिपादन प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी केले.जिल्हा व सत्र न्यायालय, सांगली येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली येथे आरोग्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती कदम होत्या. यावेळी जिल्हा न्यायाधीश क्र. 1 व्ही. डी. निंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शितल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम म्हणाल्या, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा तसेच मानसिक ताणतणाव यासारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे सर्वांनी वेळेवर योग्य तो आहार, नियमित व्यायाम, योग व ध्यान याचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य उत्तम राहिल व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फायदा होईल असे त्यांनी सांगितले.मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शितल शिंदे यांनी आरोग्याविषयी जागरूकतेबाबत मार्गदर्शन केले. आरोग्याच्या समस्या समजून घेणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले. मानसिक संतुलन कसे ठेवावे या विषयी सविस्तर माहिती सांगितली. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताण, चिंता, नैराग्य यासारख्या मानसिक समस्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे, त्यामुळे प्रत्येकांनी इतरांच्या भावना, विचार आणि वर्तन समजून घेण्याची गरज आहे. योग्य समुपदेशन, सकारात्मक विचारसरणी आणि भावनिक आधार यामुळे मानसिक आरोग्य सुधारता येते. एकूणच आपले मानसिक संतुलन चांगले असेल तरच आपले आरोग्य चांगले राहते. निरोगी आरोग्य घडवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, स्वच्छता आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच कुटुंब व समाजातील इतर सदस्यांनीही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कनिष्ठ लिपिक नितीन आंबेकर यांनी केले. आभार अधिक्षक शंकरराव वनखडे यांनी मानले. यावेळी सांगली मुख्यालयातील एकूण 80 पॅनेल विधिज्ञ उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.