दत्त कारखान्याकडून सभासदांच्या वारसांना विमा मदतीचे धनादेश वितरण

शिरोळ : राम आवळे 
दि.३० जुलै २०२६ : श्री . दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या अपघात विमा योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना तसेच अपघातग्रस्त सभासदांना विमा मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. सभासदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कारखान्याने सर्व सभासदांचा अपघात विमा उतरविला असून, या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे.कारखान्याने न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड, इचलकरंजी यांच्या माध्यमातून सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. या पॉलिसीनुसार अपघाती मृत्यू, सर्व अवयव निकामी होणे किंवा कायमस्वरूपी दोन डोळे अथवा दोन हात-पाय निकामी झाल्यास ₹१ लाख, तर एक डोळा किंवा एक हात-पाय निकामी झाल्यास ₹५० हजारांची आर्थिक मदत दिली जाते.

          याच योजनेअंतर्गत महापुरात अपघाती मृत्यू झालेल्या इकबाल बाबासो बैरागदार (अकीवाट), अरुण बंडू सावंत (राजापूर), बाबासो कोळी (तिळवणी), शिवगोंडा भीमा मगदूम (दत्तवाड-खरोसे), बळवंत अनंत कुलकर्णी (इंगळी) आणि बाबासो बाबाजी कोळेकर (कारदगा) यांच्या वारसांना विम्याचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच महादेव पिरगोंडा केरीपाळे (घरणगुत्ती) यांना मोटारसायकल अपघातात गंभीर दुखापत होऊन ३४३ दिवस कामावर हजर राहता न आल्याने ₹१ लाख ४६ हजार ५७१ रुपयांचा धनादेश देण्यात आला.

          याशिवाय अरुण बंडू सावंत यांच्या वारसांना दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था यांच्या वतीने ₹२ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. एकूण सभासदांच्या वारसांना आणि लाभार्थ्यांना ₹१३ लाख ९६ हजार ५७१ रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.  कारखान्याच्या वतीने आतापर्यंत अपघाती मृत्यू झालेल्या ११० सभासदांच्या वारसांना एकूण ₹१ कोटी १९ लाख ९६ हजार ५७१ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

           धनादेश वितरण कार्यक्रमास दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, ज्येष्ठ संचालक इंद्रजित पाटील, बाळासाहेब पाटील (हलसवडे), प्रमोद पाटील, शेखर पाटील, रणजीत कदम, कार्यकारी संचालक संजीव देसाई, सेक्रेटरी अशोक शिंदे, मॅनेजर (फायनान्स) संजय भोसले, विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर शहापुरे, सेक्रेटरी महेश परीट, विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील यांच्यासह संचालक व मान्यवर उपस्थित होते.

                 या विमा दाव्यांच्या प्रक्रियेसाठी कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे, उपमहाप्रबंधक एच. बी. अरुण कुमार, वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ, मृणाल उरुणकर, राधिका पाटील, शाखा व्यवस्थापक रोहन खाडीलकर, सहाय्यक व्यवस्थापक शीतल मोहिते, प्रशासकीय अधिकारी श्रीराज सिद्धार्थ, व्यवस्थापक वनिता कुंभार, शुभम कदम, नितीन पाटील तसेच कारखान्याच्या शेअर विभागातील परवेज मेस्त्री, अमृता चौगुले (खोत) आणि इतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.