खंडणी, मारहाण व जीवे मारण्याची धमकी; तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि ३० जुलै २०२६ : इचलकरंजीतील एका तरुणाकडे ₹ १ लाखांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतमाता हौसिंग सोसायटी परीसरातील रहिवासी नियाज सिकंदर नाईकवडे (वय ३८ ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी स्वप्नील सुनील परिट (रा. ठाकरे चौक, इचलकरंजी), आयुब अहमद अन्सार (रा. केटकाळेनगर गल्ली क्र.३, इचलकरंजी) आणि अथर्व विजयकुमार कुलकर्णी (रा. शिक्षक कॉलनी, ठाकरे चौक, इचलकरंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार,८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादींचा मुलगा मुहम्मद कैफ हा मोटारसायकलवरून घरी जात असताना पंचगंगा कारखान्याजवळ आरोपींनी त्याला अडवले. त्यावेळी स्वप्नील परिट याने ₹१ लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
त्यानंतर २८ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता संजय फाउंड्रीजवळ फिर्यादींचा मुलगा कामावर जात असताना तिघा आरोपींनी त्याला पुन्हा अडवून जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर जवाहरनगर परिसरात नेऊन पुन्हा ₹१ लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुला आणि तुझ्या वडिलांना ठार मारू, अशी धमकी देत मारहाण करण्यात आली. तसेच त्याचा मोबाईल फोनही जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 613/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 140(2), 308(5), 309(4), 126(2), 115(2), 352, 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.