शहर वाहतूक शाखा जवळील दुकानगाळे यांना धक्का लावू नये
इचलकरंजी विजय मकोटे
दि.१४: इचलकरंजी शहरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखा जवळील छोटे व्यापारी, फेरीवाले यांनी मोठा संघर्ष व सुमारे दोन महिने बेमुदत आंदोलन व उपोषण करून स्वखर्चाने दुकानगाळे उभे करणेसाठी केले आहेत. परंतु सिटी बस पार्किंग च्या नावाखाली सदर दुकान गाळे काढण्याचा घाट काही मंडळीनी घातलेला आहे. याला फेरीवाले यांचा तीव्र विरोध असून दुकान गाळ्यांना धक्का न लावता उर्वरित पार्किंग जागेवर स्टेशन करावे याबाबतचे निवेदन आज कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटनेच्या वतीने महापौर उदय धातुंडे यांना देण्यात आले. यावेळी धातुंडे यांनी याबाबत कोणतीच कल्पना नसल्यामुळे माहिती घेऊन सांगण्याचे व असा कोणताही निर्णय महासभेत झालेला नाही आणि निर्णय घेण्यापूर्वी सर्व फेरीवाले यांना विश्वासात घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.
याबाबत अधिक माहिती अशी कि दिनांक 09 एप्रिल 2026 रोजी इचलकरंजी महानगरपालिकेचे परिवहन सभापती आणि इतर अधिकारी शहर वाहतूक नियंत्रण शाखा मागील पे व पार्क जागेची पाहणी करण्यासाठी आले होते. या ठिकाणी सिटी बस चे पार्किंग करणार असल्याचे सांगितले. तसेच फेरीवाले यांनी स्वखर्चाने उभे केलेले दुकान गाळे काढायला लागणार असे या वेळी सांगण्यात आले आहे.
याच व्यवसायाच्या जीवावर फेरीवाल्यांच्या मुलांचे शिक्षण, घर संसार, देणे घेणे अवलंबून आहे. अनेकांनी या व्यवसायाच्या जीवावर नवीन घर बांधणी साठी बँकेतून कर्ज काढलेले आहे. यावरच सर्व फेरीवाले यांचे संसार उभा आहे जर या दुकान गाळ्यांना धक्का लागल्यास सर्वांचे आयुष्य उध्वस्त होणार आहे. सदर दुकान गाळ्यांना इचलकरंजी नगरपरिषद कडून मंजुरी मिळवली आहे. यानंतर सहाय्यक संचालक नगररचना, कोल्हापूर व मा. जिल्हाधिकारी यांची अंतिम मंजुरी घेऊन रीतसर हॉकर्स झोन करून नगरपरिषद कडून ना हरकत दाखला घेऊन याठिकाणी फेरीवाले यांनी स्वखर्चाने बँकेतून कर्ज काढून दुकानगाळे उभे केलेले आहेत.
प्रस्तावित सिटी बस पार्किंग ला फेरीवाल्यांचा कोणताही विरोध नाही. परंतु दुकानगाळ्यांना कोणताही धक्का लावू देऊ नये व जो पार्किंग स्टेशन करणार आहात ते या दुकान गाळ्यांची जागा वगळून करावी व फेरीवाले यांचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवावे अशी मागणी महापौर उदय धातुंडे यांना निवेदन द्वारे केली आहे. या शिष्ठमंडळ मध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील, शहराध्यक्ष सतीश नायडू, पथ विक्रेता समिती सदस्य मनीष नायडू, राकेश माळी, श्रीनिवास फुलपाटी, समीर सोलापुरे, श्रीमती सुवर्णा कुसाळे, वेणूताई पोवार, सौ. लक्ष्मी कांबळे, रशीद आंबी, सुनील तेलवे, संतोष घुनके यांच्यासह फेरीवाले मोठ्या संख्यांनी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.