आचारसंहितेचा धज्ज्या उडवणारा प्रकार! कुटगीरी,येडगेवाडीत निवडणूक काळातच गुंडगिरी; गुन्हा दाखल

संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि.१८ एप्रिल २०२६ : राजवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी संगमेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शंकर भागोजी येडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, दिनांक १७  एप्रिल २०२६  रोजी रात्री सुमारे १०  वाजण्याच्या सुमारास आरोपी पांडुरंग बाबु येडगे, सुरेश बाबु येडगे,सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे, संतोष विठ्ठल येडगे, प्रकाश धोंडीबा येडगे यांनी एकत्र येत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम १८९ (२),१९१ (२),१९० ,११८ (१) , ३५१ (२) ,३५२  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या माहितीनुसार, या घटनेत धमकी देणे, मारहाण करणे आणि कायदा हातात घेण्याचे प्रकार समाविष्ट आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल सतीश कोळगे यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारे कायदा हातात घेण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांकडून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.