‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुले आता अवकाशाच्या दिशेने . ५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर
ठाणे: प्रतिनिधी
दि.२७: जवळपास ९५०० विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या ५९ ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या उपक्रमातून ‘ग्रामीण ते अवकाश’ हे व्हिजन प्रत्यक्षात उतरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. या शैक्षणिक सहलीला सकाळी १०.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

‘मिशन भरारी’ उपक्रमाचे उद्घाटन २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ९३१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातून २००७ विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड झाली आणि अंतिम टप्प्यात ४७८ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर परीक्षा घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेतून प्रत्येक तालुक्यातील सरासरी १० विद्यार्थ्यांची निवड करून एकूण ५९ विद्यार्थ्यांना या विशेष सहलीसाठी पात्र ठरवण्यात आले असून, यामध्ये ५४ मराठी माध्यम आणि ५ उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ही सहल केवळ पर्यटन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे शिंदे म्हणाले. विद्यार्थ्यांना संशोधन, अवकाश विज्ञान, प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.सहल कार्यक्रमानुसार २८ एप्रिल रोजी विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि सनसेट व्ह्यू पॉईंटला भेट दिली जाईल. २९ एप्रिल रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन आणि प्रियदर्शिनी तारांगण येथे भेट दिली जाईल. 30 एप्रिल रोजी नैसर्गिक इतिहास संग्रहालये, तर १ मे रोजी नेपियर संग्रहालय येथे भेट देऊन परतीचा प्रवास केला जाईल.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राहण्याची व्यवस्था फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली असून, प्रवासासाठी वातानुकूलित बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सहलीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ब्लेझर, टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, कॅप, स्पोर्ट्स शूज, सॉक्स, ओळखपत्र आणि ट्रॉली बॅग आदी साहित्य देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा कमी पडू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे शिंदे म्हणाले.“जवळपास ९५०० विद्यार्थ्यांमधून ५९ विद्यार्थ्यांची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या संस्थेत जाण्याची संधी मिळत आहे.”ते पुढे म्हणाले, “एपीजे अब्दुल कलाम, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांनी नेहमीच ग्रामीण भागातील शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर दिला. त्या विचारांनुसार हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”

हे ५९ विद्यार्थी सहलीवरून परतल्यानंतर त्यांनी घेतलेले अनुभव जिल्हा परिषद शाळांमधील इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळे विज्ञानाविषयी कुतूहल आणि प्रेरणा निर्माण होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.या मुलांना इस्रो येथे पाठवण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश मोरे, आमदार शांताराम मोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, उपजिल्हाधिकारी संदीप माने आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.