यंत्रमागधारकांच्या वीज बिल सवलतीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीस दोन महिन्यांची मुदतवाढ : आ.राहुल आवाडे

इचलकरंजी : विजय मकोटे

दि.२८: यंत्रमाग उद्योगाची वीज सवलत सुरू ठेवणेसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेसाठीची मुदत वाढवावी अशी मागणी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री मा.सावकारे यांनी दोन महिन्यांची मुदतवाढ देत असलेचे सांगितले.

     दि. २७ ऑक्टोंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग उद्योगासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सक्तीचे करणेत आले होते. त्यासाठी ६ महिन्यांची मुदत या परिपत्रकामध्ये देणेत आली होती. परंतू सदर ऑनलाईन अर्ज भरण्यामध्ये यंत्रमागधारकांना अडचणी येत होत्या व त्यातील जाचक अटी पूर्ण करणे अशक्य होते. तसेच यंत्रमाग उद्योजकांची संख्या बघता दिलेल्या मुदतीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अशक्य होते. याबाबत दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने आमदार राहुल आवाडे यांच्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला मुदत वाढ मिळावी यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदन दिलेले होते.

     आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन यंत्रमाग उद्योजकांना ऑनलाईन अर्ज भरताना येत असलेल्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या व ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ देणेची मागणी केली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी दोन महिन्यांची मुदतवाढ देत असलेचे सांगितले.यंत्रमाग उद्योजकांनी तसेच वस्त्रोद्योगातील इतर घटकांनी दोन महिन्यांच्या आत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांना वीज बिलात मिळत असलेली सवलत बंद होईल. यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये संपर्क करावा असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.