स्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.0१: महाराष्ट्र दिनाच्या 67 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आज स्वराज्य भवन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साही वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी प्रथम राष्ट्रीय गीत वंदे मातरम गायले. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताच्या सुरांनी आसमंत दुमदुमून गेला होता आणि उपस्थित सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली. या सोहळ्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, प्रांताधिकारी मोसमी चौगुले यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोलीस दलाच्या वतीने संचलन करून ध्वजाला सलामी देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये राज्याभिमानाची भावना अधिक दृढ झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर या निमित्ताने फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आला होता. या सोहळ्याचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.