हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई: प्रतिनिधी

दि. ०१: महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र ही जगातील 30 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे सांगून हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

     कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल आदी यावेळी उपस्थित होते.

     ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतातील ओळींचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून दिली. महाराष्ट्र दिन हा प्रत्येकासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.

     कामगार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा उल्लेख करत ‘पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही, तर कामगाराच्या तळहातावर असते,’ असे सांगून कामगारांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. राज्याच्या तसेच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्या श्रमांमुळेच संपन्नतेची उभारणी झाली आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व कामगारांना अभिवादन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.