टेक वारी २.0 मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: प्रतिनिधी

 दि.८: विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक वारी 2.0’च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

     मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित ‘टेक वारी २.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत महासाधना सप्ताहातील विशेष पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभाग सेवा मुख्य अतिरिक्त सचिव व्ही. राधा तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, सामान्य प्रशासन विभागाने ‘टेक वारी २.0’च्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांपर्यंत सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून, विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती विकसित करणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.