जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कार्यवाहीचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.१२: राज्यस्तरीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२६-२७ च्या प्रस्तावांना जूनपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, १३ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत व त्यावरील कार्यवाहीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.
यावेळी गत आर्थिक वर्षातील आहरित निधी संबंधित यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करण्याची कार्यवाही करावी. आवश्यकतेनुसार निधी मागणी वेळेत करावी. मंजूर कामे वेळेत पूर्ण करावीत. आयपास प्रणालीवर कामांची माहिती अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत, तर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत यांनी अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील योजना) याबाबतची माहिती सादर केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.