तारदाळ येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; सहाजणांविरोधात गुन्हा

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी

दि.१६: जुन्या भांडणाचा राग मनात धरून तारदाळ येथील तरुणावर फायटर व लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओम सुहास नर्मदे (वय २२, रा. हनुमान मंदिर, जाधव वाडी, तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजल नलवडे, जय उर्फ मोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज उर्फ प्रतीम खांडकर व विजय शिंदे (सर्व रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १५ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तारदाळ परिसरातील बिअर बारसमोर ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादीची मोटारसायकल अडवून कानशिलात मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी आरोपींनी फायटरने हल्ला करून फिर्यादीला जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.त्यानंतर फिर्यादी पोलिसांत तक्रार देण्यासाठी जात असल्याचे समजल्यानंतर आरोपींनी फोन करून “तुला व तुझ्या घरातील लोकांना जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.यानंतर आरोपींनी तीन मोटारसायकलींवरून फिर्यादीच्या घराजवळ जाऊन घरात घुसून सागर दत्तात्रय नर्मदे (वय ४६) व अजय वसंत चोगले (वय ३९) यांनाही मारहाण केली. आरोपींनी फायटरने वार करून सागर नर्मदे यांच्या डोक्यात व अजय चौगले यांच्या तोंडावर दुखापत केल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.