‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 
दि.११ :घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक झाड आईच्या नावे’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या आणि स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

           कार्यक्रमादरम्यान आयुक्त पल्लवी पाटील यांनी नागरिकांना आपल्या आईच्या स्मरणार्थ किंवा सन्मानार्थ किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.

          यावेळी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, नगरसेवक मनोज हिंगमिरे, सयाजी चव्हाण, नगरसेविका मनीषा कुपटे, मोनाली मांजरे, दत्ता मांजरे, संतोष कुपटे, सहाय्यक आयुक्त नितीन बनगे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख धनंजय पळसुले, नोडल अधिकारी उमेश कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक संग्राम भोरे, स्वच्छता निरीक्षक बबन कांबळे, मानसेवी उद्यान पर्यवेक्षक अनिकेत शिलेदार, मुकादम मोशे तिवडे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महानगरपालिकेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

            महानगरपालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, पर्यावरणपूरक शहर उभारण्याच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.