रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
इचलकरंजी: हबीब शेख दर्जी
दि. २५ जून : इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करत दोन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी यांनी हा आदेश पारित केला आहे.पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याने प्रस्ताव तयार करून सादर केला होता. त्यानुसार अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी (रा. लिगाडे मळा, इचलकरंजी) याच्यावर खून, खंडणी, मारामारी, चोरी, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे एकूण ६ गुन्हे तसेच १० प्रतिबंधात्मक कारवाया नोंद आहेत. त्यामुळे त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

तसेच आसिफ सलीम मुजावर (रा. म्हसोबा गल्ली क्र. १, जवाहरनगर, इचलकरंजी) याच्यावर जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न यांसारखे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४ गुन्हे, जयसिंगपूर पोलीस ठाण्यात १ गुन्हा आणि २ प्रतिबंधात्मक कारवाया नोंद असल्याने त्यालाही दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
या दोन्ही प्रस्तावांची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी दीपक शिंदे यांनी अंतिम आदेश पारित केला.
पोलीस प्रशासनाच्या मते, संबंधित दोन्ही गुन्हेगारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून त्यांच्या हालचालींमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.