रत्नागिरीत अवैध गोवंश मांसप्रकरणी कारवाई; ५१.५ किलो गोमांस जप्त, एकाला अटक

रत्नागिरी: सचिन पाटोळे 

दि. २७ : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवैध गोवंश मांस बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त केले असून एका संशयिताला अटक केली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६ हजार ४८० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जून रोजी जिल्हाभर विशेष पोलीस बंदोबस्त आणि “मोहीम” राबविण्यात आली होती. त्यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरातील लोंगेकर नगर येथे छापा टाकला.
या कारवाईत लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. ई-१६, लोंगेकर नगर, उद्यमनगर, रत्नागिरी) हा विनापरवाना गोवंश प्राण्यांचे मांस विक्रीसाठी बाळगत असल्याचे निदर्शनास आले. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक खात्रीनंतर त्याच्या ताब्यातील ५१.५ किलो गोमांस, एक दुचाकी आणि डीप फ्रीजर असा एकूण १,०६,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३२५ तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.