आरवलीच्या ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाच्या सुशोभीकरणाला अखेर गती
कनिष्ठ अभियंता अक्षय बोरसे यांची प्रत्यक्ष पाहणी; माजी सभापती दिलीपशेठ सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
आरवली (संगमेश्वर) :सचिन पाटोळे
दि.२ जुलै २०२६: संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाच्या सुशोभीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवरुखचे कनिष्ठ अभियंता अक्षय बोरसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला. या कामासाठी माजी पंचायत समिती सभापती दिलीपशेठ सावंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले आरवली येथील हे ऐतिहासिक कुंड वर्षभर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील पर्यटकांना आकर्षित करत असते. मात्र, अनेक वर्षे या पर्यटनस्थळाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने परिसराची अवस्था दयनीय झाली होती. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा नसल्याने स्थानिकांमध्येही नाराजी होती.
या प्रश्नासाठी पाचांबे गावचे सुपुत्र तथा पंचायत समिती देवरुखचे माजी सभापती दिलीपशेठ सावंत यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी हा विषय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गरम पाण्याच्या कुंडाच्या विकासासाठी निवेदन सादर केले. मंत्री देसाई यांनी पर्यटन विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत सहकार्याचे आश्वासन दिले होते.

या पाठपुराव्याची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी कुंड परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पर्यटन विकासाच्या आशा अधिक बळावल्या आहेत.योजनेंतर्गत परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण, स्वच्छता, सुरक्षितता, बसण्याची व्यवस्था, पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा तसेच अन्य विकासकामे करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे आरवली परिसर पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थळ पाहणीवेळी कनिष्ठ अभियंता अक्षय बोरसे, माजी सभापती दिलीपशेठ सावंत, सामाजिक कार्यकर्ते दिनेश परकर, राजेंद्र भोसले, दीपक शिंगण (तंटामुक्ती अध्यक्ष), समीर पाटणकर, मुकेश चव्हाण, राजेंद्र मेणे (पोलीस पाटील), उमेश साईल, भरत भुवड, महेंद्र गुरव, चैतन्य परकर, पराग कदम, संदीप भुवड, सागर सावंत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.