महापौरांच्या मध्यस्थीने इचलकरंजी मनपा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण मागे; प्रलंबित देयकांबाबत तोडगा

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि.२१ जुलै २०२६ : इचलकरंजी  महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले ग्रॅच्युईटी व रजा अंशदान मिळावे, या मागणीसाठी २० जून २०२६ पासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर महापौर उदय धातुंडे यांच्या मध्यस्थीने यशस्वी सांगता झाली.आज महापौर दालनात महापौर उदय धातुंडे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून सुवर्णमध्य साधला. चर्चेनंतर झालेल्या निर्णयानुसार २७ जुलैअखेर दोन कोटी रुपये किंवा ३० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके अदा करण्यात येणार आहेत. तसेच पुढील महिन्यापासून दरमहा ५० लाख रुपयांपर्यंतची प्रलंबित देयके टप्प्याटप्प्याने अदा करण्याचे निश्चित करण्यात आले.

          या तोडग्याला आमरण उपोषणास बसलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आणि कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने मान्यता दिली. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती बंडू मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, ज्येष्ठ नगरसेवक रवी रजपुते, नगरसेवक सुशांत कलागते, प्रशांत नवनाळे, नागेश पाटील, मनोज साळुंखे आणि प्रमोद बचाटे उपस्थित होते.

          सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रा. ए. बी. पाटील, शिवाजी जगताप, के. के. कांबळे, हरी माळी, संजय कांबळे आणि अनिस पठाण यांनी चर्चेत सहभाग घेतला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर उदय धातुंडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.