मणेरे शैक्षणिक संकुलात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी उत्साहात

इचलकरंजी, : हबीब शेखदर्जी 
 दि.२६ जुलै २०२६ : श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त विद्यालयात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात दिंडी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

                    कार्यक्रमास इचलकरंजी महानगरपालिकेच्या नगरसेविका मोनाली दत्तात्रय मांजरेमनिषा संतोष कुपटे, दत्तात्रय मांजरे, विलास गाताडे, संस्थेचे अध्यक्ष शीतलकुमार मणेरे, उपाध्यक्ष सुभाष केटकाळे, सचिव अनिलकुमार मणेरे तसेच संस्थेचे समन्वयक अशोक वसगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माऊलींच्या पालखीचे पूजन नगरसेविका मोनाली मांजरे व मनिषा कुपटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लेझीम, टाळांच्या गजरात आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

                 दिंडीतील आकर्षण ठरलेल्या रिंगण सोहळ्यात विठ्ठल नामावरील गीत आणि नृत्याचा मनमोहक आविष्कार शाळेच्या कु. राऊत मॅडम व विद्यार्थ्यांनी सादर केला. विठ्ठल-रखुमाईच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. या कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापूरे, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे, सर्व शाखांचे विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वारकरी संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना करून देत भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.