लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे समाजतत्वचिंतक म्हणून पहावे : डॉ.आर.के.शानेदिवाण
शहाजी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
कोल्हापूर: प्रविण भोसले
दि.२ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे केवळ लोकशाहीर म्हणून नव्हे, तर समाजतत्त्वचिंतक म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या साहित्यामधून माणूस, त्याचे कष्ट, दारिद्र्य, समाजव्यवस्थेने लादलेल्या अनिष्ट रूढी-परंपरा आणि शोषणाचे वास्तव प्रभावीपणे समोर येते. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे समाजपरिवर्तनाचे विचारवंत होते, असे प्रतिपादन श्री शाहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले.लोकशाहीर, विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्राचार्य डॉ. शानेदिवाण म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी विदारक समाजव्यवस्थेचे वास्तव आपल्या साहित्याद्वारे मांडले. माणसानेच माणसाला गुलाम बनवून त्याचे हक्क आणि अधिकार हिरावून घेतल्याचे त्यांनी प्रभावीपणे चित्रित केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांच्याबरोबरच अमर शेख यांचेही मोलाचे योगदान होते. आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत अण्णाभाऊंचे विचार अधिकच प्रेरणादायी ठरतात. राजकारण्यांनी केवळ देव-धर्माच्या राजकारणात न गुंतता माणूस घडविण्याचे कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या उपक्रमासाठी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. डी. के. वळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. शोभा चाळके-म्हमाने यांनी केले, तर आभार डॉ. शिवाजी रायजादे यांनी मानले.यावेळी डॉ. आर. डी. मांडणीकर, डॉ. के. एम. देसाई, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व साहित्यावर आधारित ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तसेच ४२ विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर लेखन करून विशेष उपक्रमात सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे संयोजन डॉ. डी. के. वळवी, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील आणि प्रा. पी. के. पाटील यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.