वाणिज्य शाखा ही करिअरच्या अमर्याद संधींचे प्रवेशद्वार” – डॉ. वर्षा मैंदर्गी
कोल्हापूर: प्रविण भोसले
दि २. : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि. ३० जुलै) रोजी कॉमर्स फोरम २०२६–२७ चे उद्घाटन तसेच “वाणिज्य शाखेचा अभ्यास का करावा?” या विषयावरील भित्तीपत्रकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यानिमित्त डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूरच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “वाणिज्य शाखेचा अभ्यास का करावा?” या विषयावरील भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कॉमर्स फोरमच्या नामफलकाचेही उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
प्रास्ताविकात वाणिज्य विभागप्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी कॉमर्स फोरमची उद्दिष्टे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, कौशल्यवृद्धीसाठी आणि करिअर घडविण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. एम. एस. शिंदे यांनी करून दिला.
प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. वर्षा मैंदर्गी म्हणाल्या, “आजच्या स्पर्धात्मक युगात वाणिज्य शाखा ही केवळ पदवी मिळविण्याचे माध्यम नसून करिअरच्या अमर्याद संधींचे प्रवेशद्वार आहे. ज्ञानासोबत विविध कौशल्ये आत्मसात करणारा विद्यार्थीच भविष्यात यशस्वी ठरतो.” त्यांनी लेखाशास्त्र, बँकिंग, वित्त, करव्यवस्था, व्यवस्थापन, उद्योजकता, डिजिटल अर्थव्यवस्था, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), कंपनी सेक्रेटरी (CS) आणि कॉस्ट अकाउंटन्सी यांसारख्या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीय कौशल्ये, संवादकौशल्य आणि व्यावसायिक नैपुण्य विकसित करून स्वतःचे करिअर उज्ज्वल करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन केले.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक एम. व्ही. भोसले, स्टाफ सेक्रेटरी डॉ. के. एम. देसाई, IQAC समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. के. पाटील आणि प्रा. उज्वला पाटील यांनी केले, तर प्रा. सायली पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एन. व्ही. पाटील, प्रा. जी. आय. नाईक, प्रा. बी. के. कुंभार तसेच वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.