श्री योगेश्वरी प्रतिष्ठानतर्फे ‘कहो दिल से… यादें फिर से’ उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

इचलकरंजी: एजाज मुजावर 

दि. ९ : श्री योगेश्वरी प्रतिष्ठान या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जुन्या अवीट गाण्यांची सुरेल स्वरमैफल आणि उद्योगपती किरण दंडगे यांच्या यशोगाथेवर आधारित मुलाखतीचा नाविन्यपूर्ण ‘कहो दिल से… यादें फिर से’ हा कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या प्रांगणात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.‘अवीट गाणी, गंमत-गप्पा, किस्से आणि संवाद एका यशोगाथेचा’ असे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात ‘एक कलाकार, एक संध्याकाळ’ या उपक्रमांतर्गत स्व. गायक मोहम्मद रफी आणि अष्टपैलू गायक किशोरकुमार यांच्या लोकप्रिय युगुलगीतांसह सोलो गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

          अनिल भिडे, सौ. सुनीता शहा, अरुणकुमार साळुंखे, जगन्नाथ पोटे, विकास फडके, आर्यन फडके, बियॉन किणीकर, डी. डी. कुलकर्णी, प्रशांत देशपांडे आणि प्रा. मिलिंद दांडेकर यांनी विविध गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली. जुन्या सदाबहार गीतांनी वातावरणात आठवणींचा सुगंध दरवळला.

       कार्यक्रमाचे निर्माते व संकल्पक मनीष आपटे यांनी गीतांच्या सादरीकरणासोबतच उद्योगपती किरण दंडगे, सौ. किशोरी दंडगे आणि उदयदादा दंडगे यांच्याशी संवाद साधत दंडगे कुटुंबाच्या प्रवासातील विविध पैलू उलगडले.

         कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार तथा भाजपा प्रदेशचे माजी उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि तुळजाराम ज्वेलर्सचे अतुल शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच श्री गणेश व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी सहभागी कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.उद्योगपती किरण दंडगे यांनी संवादादरम्यान आपल्या यशोगाथेचा प्रवास उलगडताना जीवनातील संघर्ष, त्यावर केलेली मात, अथक मेहनत, कुटुंबातील एकी, अध्यात्माची बैठक, दररोजचा व्यायाम आणि संकल्पपूर्तीचे ध्येय हे आपल्या यशाचे प्रमुख गमक असल्याचे सांगितले.

     दाते मळा सांस्कृतिक, क्रीडा मंडळ आणि अनघादत्त श्रीशिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास रसिकांची मोठी उपस्थिती लाभली. गीत, संवाद आणि यशोगाथेच्या अनोख्या संगमामुळे कार्यक्रम रंगतदार ठरला.मान्यवरांचे स्वागत मनीष आपटे व अनिल भिडे यांनी केले. प्रास्ताविक सौ. रमा फाटक व वैदेही भाटवडेकर यांनी केले. नगरसेवक राजू पुजारी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. फेसबुक लाइव्हचे प्रक्षेपण श्रीनिवास गोडसे यांनी केले. सौ. संपदा ओगले यांनी आभार मानले.

कार्यक्रमासाठी उपस्थित रसिक-मित्र मंडळींसाठी अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.