नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन नदी प्रदूषण रोखुया
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, प्रतिनिधी
दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): आय.आय.टी. मुंबईच्या इन्टीग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजीव्दारे सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहामध्ये प्रशिक्षण घेण्यात आले.आय.आय.टी. मुंबई येथील पथक कोल्हापूर येथे दाखल झाले असून या दोन पथकांनी सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणा-या प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या. यात, पहिल्या पथकामार्फत विक्रमनगर,उंचगाव, मोरेवाडी, आर.के.नगर, बुध्द गार्डन, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी,परताळा, शाम सोसायटी, राजोपाध्ये नगर येथे भेट देवून पाहणी केली.
तर, दुस-या पथकामार्फत गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी (ता. करवीर),तळंदगे, तारदाळ, खोतवाडी, इंगळी, रुई, कबनूर, कोरोची, चंदूर (ता.हातकणंगले), यड्राव, टाकवडे वेस (ता. शिरोळ) येथील स्थळांची पाहणी केली.
पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी जिल्हा परिषदे अंतर्गत उपाययोजना करण्यासाठी तसेच राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन टप्पा ॥ अंतर्गत १०० दिवसांच्या धडक कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे प्रस्तावित आहे. मुंबईच्या आय.आय.टी. पथकामार्फत दुपारच्या सत्रामध्ये जिल्हास्तरावर आयोजित कार्यशाळेमध्ये इन्टीग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. आय.आय.टी मुंबई येथून योगेश राऊत, ऋषिकेश हिवरेकर, मोहित ढोका यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.