पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी प्रलंबित प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करा : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

इचलकरंजी: विजय मकोटे 

प्रतिनिधी : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी मंजूर करण्यात आलेले, मात्र प्रलंबित असलेले प्रकल्प तातडीने हाती घेऊन त्यांची कामे पूर्ण करावीत. तसेच इचलकरंजीतील झेडएलडी (ZLD) प्रकल्पाचे कामही तातडीने सुरू करून ते पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमुळे पंचगंगा नदी प्रदूषण निर्मूलनाच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

       पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असून, नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती तसेच नदीकाठच्या परिसरावर गंभीर परिणाम होत असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी बैठकीत मांडले. नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी आणि इतर प्रदूषणकारी घटक रोखण्यासाठी प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

       चर्चेदरम्यान जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तसेच आवश्यक प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा झाली. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी मंजूर करण्यात आलेले मात्र अद्याप प्रलंबित असलेले प्रकल्प तातडीने हाती घेण्यात यावेत, तसेच इचलकरंजीतील झेडएलडी प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करून ते पूर्ण करावे, असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

        या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री तथा नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अमल महाडिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक (जप्रनि), कोल्हापूर प्रादेशिक अधिकारी तसेच शिरोळ, कुरुंदवाड, हुपरी व हातकणंगले नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

         दरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या ३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात त्या वस्त्रनगरी इचलकरंजीलाही भेट देणार आहेत. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणमुक्ती आणि इचलकरंजीतील झेडएलडी प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष पाहणी व पुढील कार्यवाहीला गती मिळण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीचे संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि प्रदूषणमुक्तीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश देत संबंधित विभागांनी प्रलंबित कामांमध्ये कोणताही विलंब करू नये, असेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.