कलानगरच्या महागणपतीचा यंदा गरुड मंडप; ११ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि. १३ : इचलकरंजी शहरासह पंचक्रोशी आणि चार जिल्ह्यांतील भाविकांचे आकर्षण ठरलेल्या कलानगर येथील श्री महागणपती मंडळातर्फे यंदा आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा गरुड मंडप साकारण्यात आला आहे. खिद्रापूरच्या धर्तीवर मंडपाच्या मध्यभागी स्वामी पद्मनाभाची भव्य मूर्ती साकारण्यात येणार असून, २४ खांबांवर एका बाजूस गरुड देवता तर दुसऱ्या बाजूस पद्मावतीची मूर्ती विराजमान होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.


कलानगर परिसरातील मंडळाने तब्बल ८ हजार चौरस फूट क्षेत्रफळात हा भव्य मंडप उभारला आहे. ८५ बाय ८५ फूट आकाराच्या या मंडपात उत्सवमूर्तीसाठी आकर्षक सुवर्णगाभा साकारण्यात आला असून, स्वामी पद्मनाभाची मूर्ती १६ फूट लांब आणि साडेआठ फूट उंच असणार आहे. या भव्य मंडपामुळे इचलकरंजीसह पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हे यंदाच्या गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
गरुड मंडपाच्या कामाला मार्च महिन्यापासून सुरुवात करण्यात आली असून, जूनपासून प्रत्यक्ष जागेवर मंडप उभारणीचे काम सुरू करण्यात आले. मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवात धार्मिक परंपरा, भक्ती आणि सामाजिक उपक्रमांचा अनोखा संगम साधण्यात आला आहे.
१५ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी तब्बल ११ हजार महिलांच्या उपस्थितीत सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे. यासोबतच दररोज श्री महागणपतीची वेगवेगळ्या स्वरूपात पूजा बांधण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर रोजी सहस्रदुर्वार्चन, १७ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तसेच श्री महागणपती अथर्वशीर्ष सहस्रावर्तन पूजा होणार आहे. २० सप्टेंबर रोजी श्री महागणपतीच्या चरणी शहाळ्यांचा महानैवेद्य व महापूजा  आयोजित करण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजी अष्टफलाहार महानैवेद्य होणार आहे.२२ सप्टेंबर रोजी पंच अथर्वशीर्ष पठण, श्री महागणपती मंत्रजागर, सूर्यपुष्पार्चना, श्री महागणपतीच्या चरणी सूर्यपुष्पांची आकर्षक सजावट तसेच शास्त्रीय संगीताची स्वराधना होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी श्री गणेशयाग महायज्ञ, २५१ किलो बुंदी लाडूंचा महानैवेद्य आणि ‘अभंगरंग’ या भक्तिस्वरांच्या कार्यक्रमातून श्रीचरणी सेवा अर्पण केली जाणार आहे.२४ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा, उत्सवपूर्वसंध्या मंगल सोहळा, श्री महागणपतीच्या उत्सवमूर्तीची पालखी व नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. सायंकाळी श्रीचरणी विविध पुष्पांची पुष्पमहोत्सव सजावट, तर रात्री वाद्यवंदना होणार आहे.विसर्जन मिरवणूकही यंदा आगळ्यावेगळ्या स्वरूपात काढण्यात येणार असून, त्याचे नियोजन सुरू असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत मांगलेकर, सचिन तोडकर, प्रशांत सपाटे, अभिषेक वाळवेकर, रमाकांत वाळवेकर, पांडुरंग मांगलेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.