न्यायालयाच्या निर्णयानंतर रस्ते कामास प्रारंभ: वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर: प्रविण भोसले
दि :१७. कागल ते निढोरी हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम हे न्यायालयीन निकालानंतरच सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला .
कागल मतदार संघातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात विविध आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड उपस्थित होते.
श्री मुश्रीफ पुढे म्हणाले,या ठिकाणी जो रस्ता उकरण्यात आला आहे तो संबंधित कंत्राटदाराने सुस्थितीत करावा तसेच या रस्ता बांधणीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन पुढील कार्यवाही करावी. त्याचबरोबर कागल येथील रि सं नंबर – 426 येथे राहणाऱ्या नागरिकांच्या प्रॉपर्टी बाबत प्रशासनाने योग्य तो ताळमेळ घालून मानवीय दृष्टिकोनातून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यावर 42 गुंठे जमिनीच्या अनुषंगाने त्या ठिकाणचा नकाशा वेगळा करून या नागरिकांना न्याय देता येईल का याची प्रशासनातर्फे चाचपणी करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी स्पष्ट केले. सिमेंट रस्ता बांधणीला स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्यच राहील तथापि कायदेशीर कागदपत्रानुसारच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बांधणीची कार्यवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी या बैठकीत व्यक्त केली. तर रि सं नंबर – 426 येथील 42 गुंठे धारकांना वगळून उर्वरीत जागेचा वेगळा 7/12 उतारा करण्यात यावा तसेच ही जमीन वर्ग – १ ची करण्यात यावी अशी मागणी तेथील स्थानिक रहिवाशांनी केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी सर्वश्री डॉ संपत खिलारी,हेमंत निकम,राधानगरी प्रांतधिकारी प्रसाद चौगुले,कागल तहसीलदार अमरदीप वाकडे,सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, भाऊसाहेब हजारे, उप अभियंता सी.ए पाटील,शाखा अभियंता डी .ए पुजारी तसेच एम.पी पाटील यांच्यासह संबंधित कंत्राटदार, स्थानिक ग्रामस्थ – रहिवासी उपस्थित होते .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.