जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अमेरिकन संस्थेसोबत सामंजस्य करार
विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या संधी
जयसिंगपूर : राम आवळे
दि.३: येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाने अमेरिकेतील ‘कॉन्टॅम रेडी’ (फ्लोरिडा) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख शिक्षणाच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, त्यांचे तांत्रिक ज्ञान व कौशल्य विकसित करणे तसेच जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांशी त्यांना जोडणे हा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संशोधन, नवकल्पना व उद्योजकतेची वृत्ती विकसित करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील कॉन्टॅम रेडी या संस्थेसोबत झालेला हा करार महाविद्यालयाच्या शैक्षणिक व औद्योगिक सहकार्याच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, ट्रस्टी राजश्री मगदूम व कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींची माहिती मिळण्यास तसेच तंत्रज्ञानाधारित भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आय. आय. सी. सेलचे प्रमुख डॉ. फिरोजअमीन यांनी व्यक्त केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.