सांगली जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपारीचा दणका! सहा जण जिल्ह्याबाहेर

भिलवडीतील प्रमोद थोरात टोळी तीन महिने, तर ईश्वरपूरमधील विजय साळुंखे टोळी सहा महिन्यांसाठी हद्दपार; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची कठोर कारवाई

सांगली :मयुरी देशपांडे 

दि.२२ : जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमोद सुरेश थोरात याच्या टोळीतील चार जणांना तीन महिने, तर ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजय शंकर साळुंखे याच्या टोळीतील तीन जणांना सहा महिने सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
भिलवडीतील प्रमोद थोरात टोळी तीन महिन्यांसाठी हद्दपार
भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमोद सुरेश थोरात (वय ३२, रा. भिलवडी स्टेशन, ता. पलूस), राहुल किसन थोरात (वय २९, रा. तासगाव), सागर बाळासाहेब कदम (वय ३०, रा. भिलवडी नाका, तासगाव) आणि अमेय ऊर्फ अमेक्स संपतराव पाटील (वय २३, रा. येळावी, ता. तासगाव) या चौघांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
या टोळीविरुद्ध २०१८ ते २०२६ या कालावधीत खून, दरोडा, विनयभंग, पेट्रोलियम पदार्थांची चोरी, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांनी मारहाण, खुनाचा प्रयत्न, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून घोडागाडी शर्यतीचे आयोजन करणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची चौकशी तासगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांनी केली. दाखल गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाई, टोळीच्या हालचाली आणि सुनावणीदरम्यान समोर आलेल्या बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी संबंधित चौघांना तीन महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.
ईश्वरपूरमधील विजय साळुंखे टोळी सहा महिन्यांसाठी हद्दपार
ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजय शंकर साळुंखे (वय २७), अतुल शंकर साळुंखे (वय ३०) आणि ओंकार मोहन कदम (वय २७, सर्व रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा) या तिघांना सहा महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.या टोळीविरुद्ध २०१९ ते २०२५ या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवून हत्याराने गंभीर दुखापत करणे, घरात घुसून खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या देणे, गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, लोकसेवकावर घातक हत्याराने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणे आणि विनापरवाना देशी दारूची विक्री करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या टोळीविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. ईश्वरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी या प्रस्तावाची चौकशी करून अहवाल सादर केला. दाखल गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाई, टोळीच्या हालचाली आणि अन्य संबंधित बाबींचा सखोल विचार करून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तिघांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला.
गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरूच
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर, अरुण पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण दिडवाघ यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, भिलवडी आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.