ज्युनिअर नॅशनल खो-खो स्पर्धेसाठी प्रेमनाथ चंद्रकुडे कोल्हापूर राज्य संघाचा कर्णधार
डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी; इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि २३ : गुजरात येथे आयोजित ४५ व्या ज्युनिअर राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी इचलकरंजी येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबचा खेळाडू प्रेमनाथ संजय चंद्रकुडे याची कोल्हापूर राज्य संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीमुळे इचलकरंजीच्या क्रीडा क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.प्रेमनाथ चंद्रकुडे याने विविध स्तरांवरील खो-खो स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या खेळाचा ठसा उमटविला आहे. सातत्यपूर्ण प्रदर्शन आणि संघाला विजय मिळवून देण्यात बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यामुळे त्याने क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत कोल्हापूर खो-खो असोसिएशनच्या वतीने त्याची राज्य संघात निवड करून त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रेमनाथला डायनॅमिक स्पोर्टस् क्लबचे प्रा. शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभले असून संजय कुडचे, अतुल बुगड, भाऊ अडसुळ, भूषण शहा तसेच खो-खो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत कर्णधार म्हणून प्रेमनाथ कशी कामगिरी करतो, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.