कृष्णामाई घाटावर दीपोत्सवाने उजळली सांगली; जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याकडून विद्यार्थी, शिक्षक व संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक
सांगली :मयुरी देशपांडे
दि .२५: त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून कृष्णामाई घाटावर आयोजित भव्य दीपोत्सव आणि जनजागृती अभियानाला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कुपवाड आणि कृष्णामाई महोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २४) सायंकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कृष्णामाई घाटावर शेकडो पणत्यांची आकर्षक दीपसजावट, मनमोहक रांगोळ्या आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. दिव्यांच्या प्रकाशाने न्हालेल्या घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक दीपोत्सवाला सामाजिक जनजागृतीची जोड देत विद्यार्थ्यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली.

कार्यक्रमाला सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वच्छता अभियान, पाणी बचत आणि दुष्काळ निवारण यांसारख्या सामाजिक विषयांवर संस्थेने राबविलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन समाजहितासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाला सुरज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण लुंकड तसेच कृष्णामाई महोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे महेंद्र भाऊ चंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सचिव श्रीशैल मोटगी, प्रशासनाधिकारी रघुनाथ सातपुते, प्राचार्य प्रशांत चव्हाण, मुख्याध्यापक अधिकराव पवार, मुख्याध्यापिका सुनीता पाटील, क्रीडा विभागप्रमुख विनायक जोशी, आयटी प्रमुख राजेंद्र पाचोरे, शैला कोटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीपोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम सांगलीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.