मुलांच्यावर भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंबही मनावर उमटू द्यावे

खासदार धैर्यशील माने

इचलकरंजी -विजय मकोटे
दि ३१ डिसेंबर बदलत्या काळानुरुन डिजिटलायझेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकल टू ग्लोबल नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुलांना संस्कार देत असताना त्यांना केवळ डिजिटल शिक्षण न देता आपली मूळ घट्ट ठेवण्यासाठी भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंबही त्यांच्या मनावर उमटू द्यावे, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.  त्याचबरोबर संकल्पना करणे व त्याची पूर्तता करणे यात खूप तफावत असते. पण केलेली संकल्पना पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ती पूर्ण त्वास नेल्याबद्दल शिक्षण सभापती मनोज किसन साळुंखे यांचे खासदार माने यांनी कौतुक केले.
इचलकरंजी नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांमध्येही शिक्षणाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यार्या नवीदिल्लीच्या धर्तीवर शाळा डिजिटलायझेशन अंतर्गत पहिल्या टप्प्यात आनंदीबाई कर्वे शाळा नं. 10 आणि शाहीर अमर शेख उर्दू शाळा नं. 56 येथे नगरपालिका शाळा डिजिटल कामाच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना खासदार माने बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी होत्या.
खासदार माने म्हणाले, डिजिटलायाझेशनच्या माध्यमातून शाळांचे सुशोभिकरण झाले म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली असे होत नाही. त्यासाठी त्यांना शिकवणारा शिक्षकसुध्दा आधुनिक तंत्रज्ञानाने अवगत असला पाहिजे. त्यासाठी निवडक शिक्षकांना नवीदिल्ली येथे प्रशिक्षणसाठी पाठवावे. पहिल्या टप्प्यात सहा शाळांची निवड करण्यात आली असून त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम इमारतींची उभारणी केली जाईल व त्यानंतर डिजिटलायझेशन करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

स्वागत करुन प्रास्ताविकात शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांनी या उपक्रमाची विस्तृत माहिती विषद केली.  यावेळी आनंदीबाई कर्वे विद्या मंदिरातील विद्यार्थीनींनी स्वागतगीत तर शाहिर अमर शेख विद्या मंदिरातील विद्यार्थीनींनी समुह स्वागतनृत्य लक्षवेधी ठरले. उपस्थित मान्यवरांनीही या विद्यार्थीनींच भरभरुन कौतुक केले.
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांचे डिजिटलायझेशन करण्याचा महाराष्ट्र राज्यात इचलकरंजीत पहिलाच उपक्रम आहे. या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षण मिळणार आहे. प्राथमिक शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावत चालला असून या उपक्रमांमुळे इचलकरंजीतील हा आधुनिक पॅटर्न पाहण्यासाठी विविध भागातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर याठिकाणी निश्‍चितपणे भेट देण्यास येतील, असे सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी, नवीदिल्लीच्या धर्तीवर आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खासदार धैर्यशील माने हे केवळ घोषणा करुन थांबले नाहीत. त्यासाठी त्यांनी शासनाकडून निधीही उपलब्ध करुन दिला. त्यामुळे जलदगतीने डिजिटलायझेशनचे काम मार्गी लागण्यास मदत झाली आहे. भविष्यातही प्राथमिक शाळांमध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक मनोज हिंगमिरे, राजू बोंद्रे, नगरसेविका सौ. सुजाता कोरे, सौ. सारीका धुत्रे, सौ. सारीका पाटील, सौ. सायली लायकर, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, माजी नगरसेवक जहाँगिर पटेकरी, भाऊसो आवळे, शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी सौ. नम्रता गुरसाळे, नगरअभियंता संजय बागडे, सौ. राधिका हावळ, राजू हुल्ले आदींसह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. आभार शाळा क्रमांक 10 चे मुख्याध्यापक विलास रामाणे यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.